…हे नियम पळाले तर रोज पोट साफ होईल.

रोज पोट साफ होण्यासाठी आहार आणि विहार कसा असावा

पोट साफ होण्याचे काही नियम आहेत. हे नियम जर योग्य पद्धतीने पाळले तर कधीही पोटाचा त्रास होणार नाही.

यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे सकाळी पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे. सकाळी पोट साफ होणं गरजेचं असलं तरी हे पाहणंही आवश्यक आहे की तुमची रात्रीची झोप पुरेशी झाली आहे का. तसंच रात्रीचं जेवण तुम्ही किती वाजता घेतलं या सर्वाचा परिणाम सकाळच्या पोट साफ होण्यावर होतो.

अनेकांना हे माहीत आहे की सकाळचं पोट साफ होणं गरजेचं आहे. पण अनेकांचं सकाळी पोट साफ होत नाही अशाही तक्रारी असतातच. जर तुमचं पोट सकाळी साफ होत नाही तर त्याचं मुख्य कारण तुमची रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण हे आहे. तुमची रात्रीची झोप आणि जेवण कशा पद्धतीचं आहे ते एकदा तपासून पाहा.

असेच छोटे- छोटे नियम जर नियमितपणे पाळले तर पोटासाठी कोणत्याही डॉक्टरकडे जायची गरज लागणार नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं अन्न स्निग्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. एक उदाहरण द्यायचं झालं तर लाडू बनवण्यासाठी जेव्हा आपण त्याचं पीठ भांड्यात घेतो तेव्हा त्या भांड्याला आतून तूप लावलं जातं. यासोबतच पाश्चात्य देशात जेव्हा केक बनवला जातो तेव्हा त्या केकच्या भांड्याला आतून बटर लावलं जातं. याचं मुख्य कारण म्हणजे लाडू किंवा केकचं साहित्य त्या भांड्याला चिकटू नये हेच असतं. त्याचप्रमाणे आपण जे अन्न खातो ते चिकटायला नको यासाठी त्यात स्निग्ध पदार्थ असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्नात स्निग्धप्रमाण नसेल तर जेव्हा आतड्यांमधून (इन्टेस्टाइन) हे अन्न पुढे सरकत असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने न सरकता ते चिकटत पुढे सरकत असतं.

याचमुळे गॅस होणं, तोंडाला वास येणं, मलविसर्जन करताना वास येणं अशी लक्षणं दिसायला लागतात. याचमुळे अन्न नेहमी स्निग्ध असणं गरजेचं आहे.

आता अन्न स्निग्ध कसं असावं आणि आपल्या आहारात एवढे कोरडे पदार्थ काय असतात असा विचार अनेकांच्या मनात येतो.

आपण सलाड मोठ्या प्रमाणात खातो. त्यात तेल अजिबात नसतं. पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणात सलाड खाल्लं जातं. पण त्यांच्या सलाडमध्ये ते ऑलिव्ह ऑइल टाकता.

आपल्याकडेही अनेक डाएटिशियन पाश्चात्य संस्कृतीप्रमाणेच सलाड खाण्याचा सल्ला देतात. पण तिथलं वातावरण, त्यांचं खाणं, त्यांचं राहणीमान यात खूप फरक आहे. त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना उपयुक्त असतात त्या आपल्याला होतीलच असं नाही. काही प्रमाणात ते आपल्यालाही उपयुक्त असतातच. सलाड खाऊ नये असं अजिबात नाही. पण सलाड खाताना इतर खाण्याकडे दुर्लक्ष करू नका.

आपण आहारात अजिबात तेल घेत नाही. त्यामुळे आपल्या शरिरात स्निग्धता कमी व्हायला तयार होते आणि पोटाच्या तक्रारी सुरू होतात.
पाणी पिण्याचीही खूप चुकीच्या सवयी आपल्याकडे आहेत. पाणी पिण्याचे अनेक नियम वेगवेगळ्या प्रकारे सांगितले जातात. यात काहींच्या मते, जेवताना पाणी पिऊ नये तर काही जण जेवणाच्याआधी पाणी प्यायला प्राधान्य देतात. तर काहीजण जेवणाच्याआधी किंवा नंतर कधीच पाणी पिऊ नका असाही सल्ला देतात. पण जेवताना थोडं थोडं पाणी पिणं केव्हाही चांगलं.

तहान भागवण्यासाठी नाही तर अन्न पोटात गेल्यानंतर त्याचं जे मिश्रण तयार होतं, त्यालाही काही प्रमाणात ओलावा मिळणं गरजेचं असतं. तो जर ओलावा मुबलक प्रमाणात मिळाला तर अन्न व्यवस्थित पचेल.

याचं उदाहरण द्यायचं झालं तर, ज्या पद्धतीने चटणी तयार करताना मिक्सरमध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकत असतो, अगदी त्याचपद्धतीने जेवतानाही पोटात थोडं पाणी जाणं आवश्यक आहे.

काहीजण सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पितात. याने पोट साफ होतं असा काहींचा समज आहे. पण ते अत्यंत चुकीचं आहे. कारण जास्त पाणी प्यायल्याने आतड्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि शरीराला पाणीही पचवावंच लागतं. त्यामुळेही त्रास निर्माण होऊ शकतो.

शरीराला जेवढी गरज आहे तेवढं पाणी पिणं केव्हाही उत्तम. सकाळी उपाशीपोटी पाणी पिण्यापेक्षा जेवताना थोडं थोडं कोमट पाणी प्यायलात तर पोट अधिक चांगल्याप्रकारे साफ होऊ शकतं. यासोबतच जेवण झाल्यानंतर शक्यतो अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यानंतर पाणी पिणं केव्हाही चांगलं.

जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं किंवा जेवताना कोल्डड्रिंक्स पीणं या सर्वाचा पोटावर वाईट परिणाम होतो.

अती शिजवलेलं अन्न खाणंही फारसं चांगलं नाही. प्रत्येक घरात जेवताना टीव्ही लावला जातो. टीव्ही पाहता पाहता जेवण करणाऱ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मलविसर्जन करताना ज्या पद्धतीने स्वतःच्या शरीराचं निरीक्षण करायचं असतं. अगदी त्याचपद्धतीने जेवतानाही आपल्या शरीराचं निरीक्षण करमं केव्हाही चांगलं.

जेवताना कशाप्रकारची चव तुम्ही चाखता, वेगवेगळ्या पदार्थांना कशी चव आहे याकडे लक्ष देणं कधीही चांगलं. या कितीही छोट्या गोष्टी असल्या तरी याचा परिणाम दीर्घकाळ असतो.

टीव्ही पाहत जेवल्यामुळे वजनही वाढतं. टीव्ही पाहताना आपण किती खात आहोत याचा अंदाज लागत नाही. भूक नसतानाही अनेकदा दोन घास जास्त खाल्ले जातात. याचा परिणाम वजनावर होतो. अतिआहार घेतला तर शरीराला ते अन्न पचवायला जास्त वेळ लागतो.

रात्रीचा आहात प्रमाणापेक्षा जास्त घेतला तर तेवढाच वेळ तो पचायला लागतो. पर्यायी याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवशी मलविसर्जनात होतो.

जेवताना फारसं बोलूही नका. बोलण्याच्या नादात आपण जास्त खाऊ शकतो. तसंच नकारात्मक गोष्टी पाहू किंवा वाचू नका. त्या नकारात्मक गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या मानसिक स्थितीवर होतो.

अशा स्थितीत जर जेवणं घेतलं तर ते पचायलाही त्रास देतं.

यामध्ये अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला जेव्हा भूक लागते आपण तेव्हा न जेवता, भूक मरून गेल्यावर जेवतो. भूकेचा अंदाज न घेता फक्त जेवणाची वेळ झाली म्हणून जेवतो. भूकेचा अंदाज घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कधी भूक लागते याकडे लक्ष ठेवा. दोन- तीन दिवसांनंतर तुम्हाला कळून येईल की तुम्हाला भूक लागण्याची योग्य वेळ कधी आहे. याचप्रमाणे दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची भूक कधी लागते याचंही निरीक्षण करा. अनेकदा सकाळचा नाश्ता पचलेला नसताना दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून जेवलं जातं. याचा सर्व ताण आतड्यांवर होतो आणि पोट साफ होण्यास त्रास होतो.

त्यामुळे वरील सर्व नियम जर तुम्ही पाळले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि कधीही डॉक्टरांकडे जाऊन औषध घ्यायची गरज लागणार नाही.

1 thought on “…हे नियम पळाले तर रोज पोट साफ होईल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *