या उपायांनी पोटाचे विकारही होतील ‘अनलॉक’, एकदा करून पाहाच

https://youtu.be/5snJWA5wcoc

देशात अनलॉकची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. पण अजूनही अनेक लोक घरीच राहणं पसंत करत आहेत. अजूनही अनेकांना वर्क फ्रॉम होमच देण्यात आलं आहे. या सगळ्याचा थेट परिणाम पोटावर होतो. एकीकडे घरात बसण्याशिवाय पर्याय नाही तर दुसरीकडे घरूनच काम करायचं असल्यामुळे वेळी- अवेळी खाणंही होत आहे. हे कमी की काय शरीराला पुरेसा व्यायाम नसल्यामुळेही खाल्लेलं अन्न पचत नाही. या सगळ्यामुळे गॅस, अॅसिडिटी, पोट साफ न होण्याच्या समस्या उद्धवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की पोट साफ होण्याचेही काही नियम आहेत. जर या नियमांचं योग्य पद्धतीने जर पालन केलं तर भविष्यात कधीही पोटाचे विकार होणार नाहीत.

काही गोष्टींचं न चुकता निरीक्षण करा-

1.तुमची रात्रीची झोप पुरेशी झाली आहे का?

2.रात्रीचं जेवण तुम्ही किती वाजता घेतलं?

3.दुपारच्या जेवणाची आणि रात्रीच्या जेवणाची भूक कधी लागते याचंही निरीक्षण करा

4.सकाळचं पोट साफ न होण्याचं मुख्य कारण तुमची रात्रीची झोप आणि रात्रीचं जेवण आहे. त्यामुळेच तुमची रात्रीची झोप आणि जेवण कशा पद्धतीचं आहे ते एकदा तपासून पाहा.

अगदी सोप्या उपायांनी विसरून जा पोटाचे विकार

1.आहारात स्निग्ध पदार्थ असणं अत्यंत आवश्यक आहे.
अन्नात स्निग्धप्रमाण नसेल तर जेव्हा आतड्यांमधून (इन्टेस्टाइन) हे अन्न पुढे सरकत असतं तेव्हा ते योग्य पद्धतीने न सरकता ते चिकटत पुढे सरकत असतं. याचमुळे गॅस होणं, तोंडाला वास येणं, मलविसर्जन करताना वास येणं अशी लक्षणं दिसायला लागतात. याचमुळे अन्न नेहमी स्निग्ध असणं गरजेचं आहे.

2.जेवताना थोडं- थोडं कोमट पाणी पीणं केव्हाही चांगलं.
पाणी पिण्याचे अनेक नियम वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगितले जातात. यात काहींच्या मते, जेवताना पाणी पिऊ नये तर काही जण जेवणाच्याआधी पाणी प्यायला प्राधान्य देतात. पण जेवताना थोडं कोमट पाणी पिणं केव्हाही चांगलं. तहान भागवण्यासाठी नाही तर अन्न पोटात गेल्यानंतर त्याचं जे मिश्रण तयार होतं, त्यालाही काही प्रमाणात ओलावा मिळणं गरजेचं असतं. तो ओलावा मुबलक प्रमाणात मिळाला तर अन्न व्यवस्थित पचतं.

  1. सकाळी उठल्यावर अती पाणी पिणं टाळा.
    काहीजण सकाळी उठल्यावर एक लिटर पाणी पितात. याने पोट साफ होतं असा काहींचा समज आहे. पण ते अत्यंत चुकीचं आहे. जास्त पाणी प्यायल्याने आतड्यांवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळेही त्रास निर्माण होऊ शकतो. शरीराला जेवढी गरज आहे तेवढं पाणी पिणं केव्हाही उत्तम.
  2. जेवणानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका.
    सकाळी उपाशीपोटी भरपूर पाणी पिण्यापेक्षा जेवताना थोडं थोडं कोमट पाणी प्यायलात तर पोट अधिक चांगल्याप्रकारे साफ होऊ शकतं. यासोबतच जेवण झाल्यानंतर शक्यतो अर्धा तास पाणी पिऊ नये. त्यानंतर पाणी पिणं केव्हाही चांगलं. एवढंच नाही तर जेवण झाल्यानंतर आईस्क्रीम खाणं किंवा जेवताना कोल्डड्रिंक्स पीणं या सर्वाचा पोटावर वाईट परिणाम होतो.

5.टीव्ही पाहत कधीही जेवू नका.
प्रत्येक घरात जेवताना टीव्ही लावला जातो. टीव्ही पाहत जेवल्यामुळे वजनही वाढतं. टीव्ही पाहताना आपण किती खातो याचा अंदाज लागत नाही. भूक नसतानाही अनेकदा दोन घास जास्त खाल्ले जातात. याचा परिणाम वजनावर होतो. अतिआहार घेतला तर शरीराला ते अन्न पचवायला जास्त वेळ लागतो. रात्रीचा आहार प्रमाणापेक्षा जास्त घेतला तर तेवढाच वेळ तो पचायला लागतो. पर्यायी याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवशी मलविसर्जनात होतो.

6.जेवणाचं निरीक्षण करा आणि फार बोलू नका.
जेवताना फारसं बोलूही नका. बोलण्याच्या नादात आपण जास्त खाऊ शकतो. तसंच नकारात्मक गोष्टी पाहू किंवा वाचू नका. त्या नकारात्मक गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या मनःस्थितीवर होतो. अशा स्थितीत जर जेवणं घेतलं तर ते पचायलाही त्रास देतं.

7.जेव्हा भूक लागते तेव्हाच जेवा.
भूकेचा अंदाज न घेता फक्त जेवणाची वेळ झाली म्हणून जेवणं केव्हाही चुकीचं. भूकेचा अंदाज घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. रात्रीच्या जेवणानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कधी भूक लागते याकडे लक्ष ठेवा. दोन- तीन दिवसांनंतर तुम्हाला कळून येईल की तुम्हाला भूक लागण्याची योग्य वेळ कधी आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता पचलेला नसताना दुपारच्या जेवणाची वेळ झाली म्हणून जेवलं जातं. याचा सर्व ताण आतड्यांवर होतो आणि पोट साफ होण्यास त्रास होतो.

या सर्व सोप्या आणि परिणामकारक सवयी जर अंगी बाळगल्या तर काही दिवसांमध्येच तुम्हाला शरीरात सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. तसेच भविष्यात कधीही पोटाचे विकार उद्भवणार नाहीत.

हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या मध्ये संगीतलेले उपाय अमलात आणा .तुमच्या प्रियजनांना share करा.

डॉ सुशांत नागरेकर

नवी मुंबई

1 thought on “या उपायांनी पोटाचे विकारही होतील ‘अनलॉक’, एकदा करून पाहाच”

  1. गजानन पळसुलेदेसाई

    धन्यवाद डाँ.सुशांत जी खुपच छान मार्गदर्शन केलत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *