मूळव्याध का होतो ? त्यावरील घरगुती उपाय

मूळव्याधीचा (fissure)त्रास हा जितक्या लवकर शोधून त्यावर उपाय करता येईल तितकं ते रुग्णासाठी फायदेशीर ठरू शकतं.

मूळव्याध वरील उपाय

मी डॉक्टर या नात्याने आज या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला मूळव्याधीची कारणं आणि ह्या व्याधीवरील उपाय सुचवणार आहे. हे घरगुती उपचार नक्कीच रुग्णाला आराम देऊ शकतील.
———————————————————————————————————

मूळव्याध म्हणजे नक्की काय ?


मानवी शरीराची रचना लक्षात घेतली तर उत्सर्जन क्रियेत संडासाचा जो मार्ग आहे तिथे जेंव्हा एक अंकुर तयार होतो आणि त्याची झालेली वाढ जेंव्हा शरीरातील मलाला बाहेर टाकण्यात अडथळा ठरू लागते तेंव्हा त्या विशिष्ट जागी प्रचंड वेदना होऊन त्रास होण्यास सुरुवात होते. यातून जडलेल्या व्याधीला मूळव्याध असे म्हणतात.

संडासाच्या मार्गात तयार झालेला अंकुर किती मोठा आहे त्यानुसार त्या व्याधीची दाहकता ठरते. अंकुर जितका मोठा तितका त्रास अधिक होण्याची भिती असते.


बरेचवेळा सुरुवातीला संडासाच्या मार्गात एखादी जखम झाली असेल तरीसुद्धा त्या जागेतून रक्तस्त्राव होऊन त्रास होण्याची शक्यता असते. मात्र याला मूळव्याध म्हणत नाहीत. इंग्रजीमध्ये ह्याला fissure असे म्हणतात.

ही मूळव्याधीची सुरुवात असते असे आपण म्हणू शकतो. मात्र हा त्रास सुरु होण्याची नक्की कारणं काय आहेत हे प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे.

मूळव्याधीचा त्रास सुरु होण्यामागची नक्की कारणं काय आहेत ? Cause of fissure


१) ज्यांच्या आहारात तिखटाचं प्रमाण हे अधिक असतं त्यांना हा त्रास अधिक असतो असे निदर्शनास आले आहे. यासोबतच ज्यांची सततची फिरतीची नोकरी किंवा बैठे काम असते त्यांना हा त्रास अधिक होत असल्याचे निरीक्षण सांगते.


२) चुकीची आहार- विहार पद्धती शरीरातील उष्णता वाढवायला पोषक वातावरण तयार करते जे मूळव्याधीच्या आजाराला आमंत्रण देते.


३) तुमच्या आहारात कोरड्या पदार्थांचा समावेश अधिक असेल तर त्याचा संबंध हा मूळव्याधीच्या पहिल्या काही लक्षणांमध्ये असतो. कमी स्निग्धता असलेले कोरडे पदार्थ जर आपल्या रोजच्या आहारात अधिक असतील तर संडास होताना त्रास होऊ शकतो आणि त्यातूनच संडासाच्या जागेवर जखम होऊन मूळव्याधीला सुरुवात होऊ शकते. याचा अर्थ संडासाच्या जागेवर झालेली प्रत्येक जखम ही मूळव्याधीला आमंत्रण देतेच असे नाही पण याबाबत सतर्क असणे कधीही फायद्याचेच ठरेल.

मूलव्याधी वरील घरगुती उपाय ! Home remedy for fissure


१) आहारात गरम पदार्थांचा समावेश करणं टाळा आणि त्यासोबत स्निग्ध पदार्थ आहारात अधिक असू द्या.


२) मूळव्याधीचा त्रास होत असल्यास एक चमचा तुपात एक चिमूट सेंदव मीठ घालून ते मिश्रण जेवणाच्या मध्यात म्हणजे अर्धे जेवण जेवल्यानंतर घ्यावे. हा उपाय दुपार आणि रात्रीच्या दोन्ही जेवणादरम्यान केवळ सात दिवसांसाठी अंमलात आणायचा आहे.


३) काळ्या मनुक्यांचं पाणी पिणे हा ही मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास मदत करू शकतो. काळ्या मनुक्यांचं पाणी तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. ह्यासाठी १० काळ्या मनुका रात्रभर अर्ध्या ग्लास पाण्यात भिजत ठेवाव्यात. सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी त्याच मनुका आधी खाऊन मग त्यानंतर त्यासोबतचे पाणी प्यावे. यामुळे रक्तातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

वरील सर्व उपाय आठवडाभर जरी केले तरी रुग्णाला फरक तात्काळ जाणवेल. त्यामुळे तुम्हाला मुळव्याधी सदृश्य त्रास होत असल्यास सुरुवातीला हे घरगुती उपाय नक्की करा आणि त्यानंतर गरजेनुरूप आयुर्वेदिक डॉक्टरांशी किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधा.

Dr Nagarekar

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *